आज मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यास सकाळी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईट ला विझिट दिली. बघते तर काय आधीच नोटिफिकेशन्स ची रांग लागली होती. आवडत्या पोस्ट लाइक करून सहज स्क्रॉल खाली नेला तर एकीकडे "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" अशा महान काव्याने मराठी मनाला बांधून ठेवणारी काव्य, तर लगेच दुसरीकडे मराठी मनातील मतभेदांचे रूपांतर जातीयवाद, वर्चस्ववाद दर्शवणार्या, काटेरी शब्द कट्यारा कडे गेले.हे सर्व बघून दोन मिनिटे मन सुन्न झाले.शुभेच्छा तर दूरच, पण आता हसावे,रडावे की,अगदी जगाकडे पाठ फिरवून, आमचे काही घेणेदेणे नाहीं, अशा आविर्भावात बसावे तेच कळत नव्हते. आणि सर्वात कमाल म्हणजे, सुशिक्षित म्हणवणारे,स्वताच्या कार्यक्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कार्यरत असणारे, दिग्गज मंडळी, इतिहासाचा स्वतःच्या मनाप्रमाणे ,अगदी सोईस्कर रीत्या वापर करून, आम्ही कसे श्रेष्ठ? हे दर्शवण्यासाठी, आपसी संबंध विसरून अगदी लहानमुलागत भांडत होते. लहान मुलांच्या भांडणाला तरी काही अर्थ असतो किंवा निरागस असे एखादे उद्दिष्ट असते. खरे पाहता, 'इतिहास हा आपल्या सर्वांनाच स्वाभिमानाचा विषय आहे. वाद उत्पन्न करण्याचा नाही. ' पण पोरकटपणाने भांडून, आपले सर्व संस्कार, शिक्षण, अनुभव, गुंडाळून ठेवत, मतभेदाचे नाव देऊन, वादग्रस्त विषय,पुनः पुनः काढून, सोशल मिडिया वर भांडणाऱ्या महंत लोकांना काय म्हणावे?
अगदीच वर वर बघता हा विषय विचारांना गाम्भीर्याकडे नेत असतांनाच मोबाइल वाजला, मैत्रिणीचा फ़ोन होता. तिची एक व्यक्तिगत समस्या तिने माझ्याकड़े विश्वासाने व्यक्त केली. त्यावर काळजी करू नकोस। आम्ही तुझ्याबरोबर आहोत. असे बोलून फ़ोन ठेवल्यावर एक गोष्ट लक्षात आली की "मैत्री ही एकमेव भावना माणसाला - जात, धर्म ,श्रीमंती,गरीबी या सर्व भावनांच्या पलीकडे नेऊन ठेवते." मग सोशल मेडियावरच मनातला सर्व राग काढून हे फेसबुक फ्रेंड्स म्हणवणारे शत्रु प्रत्यक्ष भेटीत "मैत्री निभवतात की पोस्ट नंतर शत्रुता?" असा थोड़ा मिश्क़ील प्रश्न मनाला हसवुन गेला आणि मराठी भाषा दिवस हा
मराठमोळ्या लोकांच्या विचारताच मावळला.
दुसऱ्या दिवशी बघते तर काय आश्चर्यच. आदल्याच दिवशी फेसबुक वर स्वत:च्या वर्चस्वाची ग्वाही देत, एकमेकांवर आरोपांचे ताशेरे ओढणारे, इतिहासाचे उपासक असलेल्या लोकांमधलेच, दोन लढ़वैये,जेंव्हा प्रत्यक्ष भेटीत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून तत्व,समानता, धर्मनिरपेक्ष राज्य अशा मोठ- मोठ्या विषयांवर गहन चर्चा करतांना दिसली तेंव्हा तर कपाळावर हात मारणेच बाकी राहिले होते. येवढेच नव्हे तर हे बहाद्दर, एकमेकांच्या हो ला हो मिसळत 'कुठे चाललय जग?' म्हणत एकमेकांना पाठबळ देत होते .आता मात्र मला स्वतःच्याच प्रश्नाचे उत्तर भेटले - अशा विद्वानांच्या सभेत आपणच ठरणार मुर्ख. कारण -
" जो तो मती सापडला, तयाची तोची थोर."
No comments:
Post a Comment