Pages

Sunday, February 27, 2022

देवूरवाडा - श्री नृसिंह मंदिर

देवूरवाडा  अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील एक छोटे गाव असुन, अमरावती पासन 50km च्या अंतरावर वसले आहे.श्री लक्ष्मी नृसिंह उपासकांचे अनंत काळापासून श्रद्धास्थान मानले जाते. चंद्रभागा,पूर्णा व मेधा या 3 नद्यांचा संगम(त्रिवेणी संगम) हा याच ठिकाणी होऊन मेधा नदी ही या संगमावर लुप्त झालेली आहे. तसेच चंद्रभागा व पूर्णा नदी ह्याचा प्रवाह पुढे 2 भिन्न दिशेनी झालेला आढळतो.

देवूरवाडा या ठिकाणी प्रवेश केल्यावर सर्वप्रथम लोक त्रिवेणी संगमाच्या नद्यांचे दर्शन घेतात.  प्रचलित आख्यायिकेनुसार जेंव्हा नृसिंह भगवान यांनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्याचा वध केला, त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमाच्या पात्रात आपले हात धुतले त्यामुळे त्या विशिष्ट ठिकाणचे पाणी कधीही आटत नाही असे सांगण्यात येते. या  कारणास्तव सर्व नृसिंह भक्त भक्तिभावाने त्या पात्राची आवर्जून पूजा करतात. या प्रवाहाच्या समोरच असलेल्या भव्य मंदिरात अनेक देवदेवतांच्या काही स्वयंभू व काही प्रस्थापित मूर्त्या आपणास पाहायला मिळतात. मंदिरात प्रवेश करताच  नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर लक्षवेधी ठरते . तसेच उजव्या हाताला मोहिनी देवी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व डाव्या हाताला राधाकृष्ण तसेच राम लक्ष्मण सीता यांचे मंदिर आणि समोर हात जोडून उभा असलेला हनुमंत अशी ह्या मंदिराची रचना आपल्या मनात भक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम करते.  मनाची संतुष्टता येवढ्यात होउ  न देता दैवी चमत्कार असा की  याच मंदिराच्या परिसरात महादेवाचे साडे 11 स्वयंभू ज्योतिर्लिंग पाहायला भेटतात. म्हणजेच 1 ज्योतिर्लिंग अजून असते तर  या स्थानाला  काशी इतकेच महात्म्य प्राप्त झाले असते (प्रचलित -ज्या ठिकाणी महादेवाचे साडे 12 ज्योतिर्लिंग असतात त्या स्थानाला काशी चा मान प्राप्त होतो. ) 

देवूरवाडा येथील श्री नृसिंह मंदिराची आम्ही आमच्या बालपणापासन ऐकलेली कथा अशी- श्री लक्ष्मी,नृसिंह आणी प्रल्हाद यांच्या मूर्त्या त्रिवेणी संगमाच्या पुराच्या पाण्यातून वर आल्या व देवूरवाडा येथील शिंगोरे परिवाराने त्या मूर्तींची स्थित मंदिरात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून देवूरवाडा स्थित नृसिंह मंदिर हे नृसिंह भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. येथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते असे अनेक  प्रत्यंतर लोकांना आले आहेत. देवूरवाडा येथील शिंगोरे परिवार नृसिंह उपासक असून येथील मंदिराचा कार्यभार  आजवर त्यांनी सांभाळला.त्याचप्रमाणे याच मंदिराच्या गाभाऱ्यात दत्तात्रेयांची

काळ्या पाषाणाची मूर्ति बघावयास भेटते ही मूर्ती देखील स्वयंभू असावी असे अनेक जणांचे मत आहे. त्याचप्रमाणे मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी रेखीव अशा गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घडते.त्यामागे भगवान शंकराची पिंड आहे. तसेच मंदिराच्या परिसरात कृष्ण मंदिर देखील पाहावयास भेटते.या गावात बालाजी मंदिर देखील आहे. सर्व देवांच्या वास्तव्याचे गाव असल्याने याला देवूरवाडा असे नाव पडले.

माझे आजोळ हे नृसिंह उपासक असल्याने आम्ही लहानपणापासन दरवर्षीच देवूरवाडयाला जात असू. त्यामुळे त्या देवस्थाना बद्दल प्रचंड श्रद्धा व समर्पण भाव हा आपसूकच निर्माण होत गेला. माझे आजोबा (कृ. वा. तारे) प्रत्येक फेरीत काही ना काही अनुभूती वा अनुभव सांगत असत. त्यांचे कथन इतके छान  असायचे  की प्रासंगिक वर्णन ऐकतांना सुद्धा अंगावर शहारे उभे राहायचे. ते स्वतः नृसिंह उपासक असल्याने त्यांनी या गावी मंदिरातील परिसरात  श्रीमद भागवत वाचन व कथन केले. त्याच परिसरात त्यांना आलेली प्रचिती म्हणजे त्यांनी रचलेले 'नृसिंहाष्टक'.  

या अष्टकाची  शब्दरचना व अर्थ जर आपण समजून घेतला तर लक्षात येईल की ईश्वरी साक्षात्कार याहून वेगळा काय असेल? अर्थातच अशा प्रकारच्या अनुभुती ह्या परमेश्वरा प्रती उत्कट श्रद्धा भाव व संपूर्ण शरणागती असल्याखेरीज शक्य होत नसतात. 

 लहानपणापासन बघितलेले हे गाव,मंदिर,नद्या तसेच तेथील धार्मिक वातावरण हे नेहमीच मनाला आत्मिक समाधान व आनंद देणारे आहेत. गेल्या 4 पिढ्यांचा संबंध असलेले हे गाव व भगवान नृसिंह लक्ष्मी यांचा आशीर्वाद पुढच्या पिढीला म्हणजेच माझी मुलगी पृथा हिला देखील लाभों अशी प्रार्थना नृसिंह चरणी करते.


(Prutha's planet या चॅनल वर असलेला 

' देवूरवाडा - श्री नृसिंह मंदिर' ह्या Vlog मध्ये संपूर्ण प्रमुख ठिकाणांचे छायाचित्र तसेच चल चित्र घेण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित Vlog मध्ये वरील माहिती देणे शक्‍य नसल्याने अनेक नवीन viewers ना याद्वारे एक परिचयात्मक माहीती घेता येईल.)